Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही, 5 जून दरम्यान मोर्चा काढणार, विनायक मेटेंचा ठाकरे सरकारला इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मराठा आरक्षण मिळेपर्यंत थांबवणार नाही आणि तिव्र आंदोलन करण्यात येईल. 18 मे रोजी राज्यभरातील तहसीलदारांना निवेदन देणार आहे. त्यानंतर मोर्चा काढणार आहे. 5 जूनच्या आसपास हा मोर्चा काढणार असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विनायक मेटे यांनी आज (शुक्रवार) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका मांडली.

विनायक मेटे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत थांबवणार नाही. तीव्र आंदोलन करण्यात येईल. मंत्र्यांना फिरु देणार नाही. त्याच्या गाड्या आडवण्यात येतील. महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. येत्या 18 मे रोजी राज्यातील सर्व तहसीलदारांना निवेदन देणार आहे. त्यानंतर 5 जूनच्या आसपास हा मोर्चा काढण्यात येईल, असे मेटे यांनी सांगितले.

म्हणून लॉकडाऊन वाढवला

विनायक मेटे यांनी राज्य सरकारने वाढवलेल्या लॉकडाऊनवर भाष्य केले. मराठा समाजाची मुस्कटदाबी करण्यासाठी सरकारने 15 दिवस लॉकडाऊन वाढवला आहे. देवेंद्र फडणवीस यांना सांगून राज्यातील मराठा आरक्षणाबाबत ज्यांना कळकळ आहे अशा सर्वांना घेऊन राष्ट्रपती यांची भेट घेणार असल्याचे मेटे यांनी यावेळी सांगितले.

ठाकरे सरकारवर घणाघात

केंद्र सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यासाठी केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचे विनायक मेटे यांनी यावेळी आभार मानले. अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधताना मेटे म्हणाले, नाचता येईना अंगण वाकडे अशी भूमिका चव्हाण यांची आहे. सगळं केंद्रच करणार मग तुम्ही काय करणार ? सगळं दुसऱ्यावर ढकलत खुर्चा उबवत बसणं हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया न करता राज्यपालांना भेटणं ही नौटंकी करुन जनतेला गुमराह करण्याचं काम ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप मेटे यांनी यावेळी केला.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

–  18 मे रोजी राज्यभरातील तहसीलदारांना निवेदन देणार

–  तीव्र आंदोलन केले जाईल

–  मंत्र्यांना फिरू देणार नाही, गाड्या अडवणार

–  आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही

–  केंद्राच्या याचिकेमुळे मोठा फरक पडेल

–  महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही

–  अशोक चव्हाण यांची मात्र नाचता येईना अंगण वाकडं भूमिका

–  सगळ केंद्र करणार तर तुम्ही काय करणार ?

–  EWS आरक्षण लागू करत नाहीत

–  OBC ना ज्या सोयी सवलती लागू आहेत त्या देत नाहीत

–  तोंडाला कुलूप लावून बसलेत सगळे पोपटपंची करणारे नेते आहेत

–  सारथी अजून पूर्णपणे सुरु नाही

–  राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे ते न करता केंद्राकडे बोट दाखवणं म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पहायचं वाकून

–  मराठा समाजाला आरक्षण न देता सत्ता वाचवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा एवढेच काम

–  याला उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण जबाबदार

–  राज्यपालांना भेटून आघाडी सरकार विरोधात संविधान भंगाची तक्रार करणार