मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी ! शरद पवार यांच्यासमोर शेलारांनी केलेल्या वक्तव्याने चर्चेला उधाण

मराठा समाजातील महिला मुख्यमंत्री व्हावी, असं विधान भारतीय जनता पक्षाचे नेते अशिष शेलार यांनी आज केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास शेलार त्यांनी हे विधान केलं. त्यांनी केलेल्या या विधानाची राजकीय वर्तुळात सर्वत्र जोरदार चर्चा आहे. दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या “कर्तुत्ववान मराठा स्त्री’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला भाजपा नेते आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजपा नेते आशिष शेलार यांनी मराठा समाजातील स्त्रियांच्या कर्तुत्वावर भाष्य केलं. पुढे ते म्हणाले, की मोठ्या पदावर मोठ्या मनाच्या व्यक्ती फार कमी असतात. “कर्तुत्ववान मराठा स्त्री” पुस्तकात शरद पवारांच्या आई शारदाबाई यांच्याबद्दल जे लिहिले ते अतिशय प्रेरणादायी आहे. मराठा समाजातील कर्तृत्ववान स्त्री मुख्यमंत्री व्हावी, असं मला वाटतं. तसं होणार असेल तर त्याला माझे समर्थन आहे.

आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेलार यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर, शेलार यांच्या विधानाचा संदर्भ भाजपमध्ये सुरू असलेल्या ताज्या घडामोडींशी जोडला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोनच दिवसांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकलं. निवडणुकीच्या प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांची नेमणूक करण्यात आली. या बैठकीला शेलार हजर नव्हते. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत असताना शेलार यांनी केलेले विधान आणि उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचं यश

२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेने ८४ तर भाजपने ८२ जागा जिंकल्या. विशेष म्हणजे त्या आधीच्या निवडणुकीत भाजपच्या जागा केवळ ३१ होत्या. शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रचंड यश मिळवलं. मात्र, यंदा त्यांच्याकडे मुंबई ऐवजी ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.