आरक्षणासाठी मराठा समाजाचा पुन्हा एकदा ‘एल्गार’, Lockdown मध्येही मोर्चा निघणार

बीडः पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोष खदखदत आहे. असे असताना राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा आवाज आणि आंदोलन दडपण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याचे षड्यंत्र रचल्याचा गंभीर आरोप शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. मात्र लॉकडाऊन असले आरक्षणाचा मागणीसाठी पुन्हा एकदा एल्गार ठरला असून त्याची सुरुवात बीडमधून होणार आहे. 5 जूनला बीडमध्ये मराठा आरक्षण मोर्चा काढण्यात येणार आहे. तो मोर्चा कुठल्याही कारणास्तव रद्द केला जाणार नसल्याचे आमदार मेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आमदार विनायक मेटे म्हणाले की, या मोर्चात मराठासह, धनगर, लिंगायत, ब्राम्हण, मुस्लीम समाजाचे नागरिक देखील असणार आहेत. या समाजातील नेत्यांना एकत्र करून आम्ही आरक्षणाची लढाई लढणार आहोत. हा मोर्चा मूक नसून सरकारला धारेवर धरणारा असणार आहे. असा इशारा देखील मेटे यांनी दिला आहे. न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या निकालात अनेक बाबी विसंगत आहेत. अनेक राज्यात 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण आहे. 102 च्या घटना दुरुस्तीवर शिवसंग्रामने याचिका दाखल केली होती. यात केंद्राला पार्टी केले होते की केंद्राने भूमिका स्पष्ट करावी. या संदर्भात राज्य सरकारला फेर विचार याचिका दाखल करा असे, वारंवार सांगून देखील ऐकले नाही. पण केंद्राने फेर विचार याचिका दाखल केली. जर या याचिकेवर सुनावणी झाली तर आरक्षणाची लढाई 50 टक्के जिंकली असे म्हणावे लागेल. तसेच सुप्रीम कोर्टाचा निकालापूर्वी राज्य सरकारने केलेला नोकरभरती मधील रखडलेला नियुक्त्या लवकरात लवकर द्यावेत. तसेच आठ दिवसात जर EWS चे आरक्षण संदर्भात राज्याने सुधारित आदेश काढावा अन्यथा न्यायालयात धाव घेऊ असा इशारा मेटे यांनी दिला आहे.