आदिनाथ कोठारेची बॉलीवूडमध्ये एंट्री ; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय क्रिकेट संघाने लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर 25 जून 1983 या दिवशी विश्वचषक जिंकले होते. यानंतर ही तारीक भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरली गेली. याच विजयावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 83 असं या चित्रपटाचं नाव आहे. यात चिराग पाटील असणार आहे असं काही दिवसांपू्र्वी समजलं होतं. यानंतर आता आणखी एक मराठमोळा चेहरा यात झळकणार असल्याचे समजत आहे. आदिनाथ कोठारे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हे समजल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. दरम्यान रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

आदिनाथने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत आपलं नाव नोंदवलं आहे. आदिनाथ कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीतलं एक नावाजलेलं नाव झालं आहे. केवळ अभिनेता म्हणून नाही तर, दिग्दर्शक तसेच निर्माता म्हणूनही त्याने त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यानंतर आता आदिनाथ बॉलीवूडमध्ये पाऊल टाकत आहे.

83 या चित्रपटात काम करण्यासाठी आदिनाथ खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे. लवकरच तो या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. मुख्य म्हणजे पूर्व भारतीय दिलीप वेंगसकर यांची भूमिका आदिनाथ साकाणार आहे. कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. आदिनाथने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

दाक्षिणात्य अभिनेता जीवा 83 या चित्रपटात माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका साकारणार आहे. मराठी अभिनेता चिराग पाटील त्याचे वडिल संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. क्रिकेटर सुनील गावस्कर यांची भूमिका ताहिर भसीन साकारणार आहे. पंकज त्रिपाठी मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे कपिल देवची २३ वर्षांची मुलगी अमिया ’83’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शिकेचे काम करणार आहे. चिराग याने वृत्तपत्रांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या शुटींगसाठी कपिल देव मदत करत आहेत. रणवीरला क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यासाठीही ते हातभार लावत आहेत. क्रिकेटचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.