ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचं दीर्घ आजारानं निधन

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – ज्येष्ठ नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक लीलाधर कांबळी यांचं मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 83 वर्षाचे होते गेली दोन दिवस ते कॅन्सरशी लढा देत होते. रात्री 9 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या ‘वस्त्रहरण’, ‘हसवाफसवी’, ‘केला तुका नी झाला माका’, ‘वात्रट मेले’ यामधील त्यांनी साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या.

त्याचबरोबर ‘भाकरी आणि फूल’, ‘गोट्या’, ‘बे दुणे तीन’, ‘कथास्तु’, ‘हसवणूक’, ‘कॉमेडी डॉट कॉम’, ‘चला बनू या रोडपती’, ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’, या टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे. यामुळे त्यांना नव्याने लोकप्रियता मिळाली होती.

त्यांच्या दिलीप प्रभावळकर यांच्या ‘हसवाफसवी’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहण्यासारखी ठरली. ते मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करत असते. त्याचबरोबर नोकरी सांभाळून त्यांनी नाटकामध्ये काम केले. त्यांची ‘कस्तुरी मृग’, ‘राम तुझी सीता माऊली’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘आमच्या या घरात’, ‘शॉर्टकट’, ‘दुभंग’ अशाप्रकारे 30 हून अधिक नाटकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. ‘वात्रट मेले’ नाटकामधील पेडणेकर मामा, ‘केला तुका नी झाला माका’ मधील आप्पा मास्तर, ‘वस्त्रहरण’ नाटकातील जोशी मास्तर असा त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या.