डॉ. अमोल कोल्हेंविरोधात अभिनेता सुबोध भावे राजकीय मैदानात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता वेध लागले आहेत ते चौथ्या टप्प्यातील मतदानाचे शिरूर लोकसभा मतदार संघातील मतदान देखील चौथ्या टप्प्यात आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हे तर भाजप -शिवसेना युतीकडून आढळराव पाटील लोकसभेच्या मैदानात आहेत. या दोघांच्यात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. पण आता या राजकीय मैदानात अभिनेता सुबोध भावेने देखील उडी घेतली आहे. भाजप -शिवसेना युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी अभिनेते सुबोध भावे मंचर येथे सभा घेणार आहेत.

सुबोध भावे आढळराव पाटलांचा प्रचार करणार म्‍हणजेच ते अभिनेते डॉ. अमोल कोल्‍हे विरोधात मैदानात उतरणार आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. यावेळी सुबोध भावे आणि आरजे मलिष्का या दोघांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली होती. विशेष बाब म्‍हणजे सुबोध भावे शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या शिरूर लोकसभा मतदार संघात यावेळची लढत मोठी रंगतदार होणार आहे. सलग तीन वेळा खासदारकीच्या खुर्चीवर विराजमान झालेले शिवसेना नेते आढळराव पाटील आता चौथ्यांदा खासदारकीच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न उराशी घेऊन लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. तर शिवसेनेचा शिरूरमधला बुरुज ढासळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनतेचा कौल नेत्याला राहणार की अभिनेत्याला हे येणारा काळच ठरवेल.