मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांचेही ‘जय श्री राम’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. सुमीर राघवन, सुबोध भावे, प्रसाद ओक यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर ‘जय श्री राम’ असं ट्विट केले आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र अयोध्येत आहे. पंतप्रधान मोदी हनुमान गढीला भेट देऊन हनुमानाची पूजा करतील. त्यानंतर ते रामलल्लाचे दर्शन घेतील आणि भूमिपूजन समारंभात सहभागी होतील.

पंतप्रधानांच्या हस्ते ‘श्रीराम जन्मभूमी मंदिर’ या नावाने टपाल तिकिटाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पहिल्यांदाच राम मंदिराच्या प्रारूपाची छायाचित्रे प्रसिद्ध केली. हे मंदिर तीन मजली असून 161 फूट उंच असेल. मंदिराच्या मूळ आराखडयात बदल करण्यात आला असून आता मंदिराचा आकार व उंची दुपटीने वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक भक्तांना एकाच वेळी रामाचे दर्शन घेता यावे यादृष्टीने हा बदल करण्यात आला आहे.