‘बापमाणूस’ फेम अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री अभिषाला पाटील यांचे कोरोनाने मंगळवारी (दि. 4) दुपारी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. पल्लवी पाटील, संजय कुलकर्णी यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

काही दिवसापूर्वी अभिलाषा पाटील चित्रीकरणासाठी बनारसला गेल्या होत्या. त्याठिकाणी त्यांना ताप येत असल्याने त्या मुंबईला परतल्या. त्यांनी कोरोनाची टेस्ट केली असता कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून त्या आयसीयुत होत्या. पण काल दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिलाषा पाटील यांनी अनेक मालिका, चित्रपटात काम केले होते. बापमाणूस या मालिकेत त्या पल्लवी पाटीलच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्या. त्यांनी प्रवास, तसेच बायको देता का बायको या चित्रपटात काम केले होते. तसेच सुशांत सिंग रजपूतची मुख्य भूमिका असलेल्या छिछोरे या चित्रपटात देखील त्या एका छोट्याशा भूमिकेत दिसल्या होत्या.