‘या’ चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार ‘श्रिया’ 

मुंबई : वृत्तसंस्था – ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटात अभिनेता राणा डग्गुबाती सोबत अभिनेत्री कल्की कोचलिन दिसणार असल्याची चर्चा होती. परंतु आता या चित्रपटात तिच्या जागी मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. ही बातमी खुद्द श्रियाने दिली आहे. शाहरूख खानच्या ‘फॅन’ चित्रपटातून श्रियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता या चित्रपटातून ती साऊथच्या चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
श्रिया पिळगावकरने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, २०१९ वर्षाची सुरूवात खूप चांगली झाली असून मी हाथी मेरे साथी चित्रपटात राणा दुग्गाबतीसोबत दिसणार आहे. या चित्रपटात काम करायला मजा येणार आहे आणि या चित्रपटाचा विषय खूप चांगला आहे. माझ्यासाठी हा चित्रपट खूप खास असून पहिल्यांदाच मी त्रिभाषिक चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटातून तमीळ व तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे.
१९७१ मध्ये आलेला राजेश खन्ना यांचा चित्रपट ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाला श्रद्धांजली म्हणून या चित्रपटाची  निर्मिती करणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु हा चित्रपट वेगळा असून या चित्रपटातही हत्ती आणि इतर प्राणी दिसून येणारअसल्याचे कळले आहे.केरळच्या जंगलामध्ये चित्रपटाचे शुटिंग असे ट्विट करत काही दिवसापूर्वी राणाने चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्याचे सांगितले होते.राणा आणि श्रियाशिवाय यामध्ये बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राटही महत्वपूर्ण भूमिकेत दिसून येणार आहे.