प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे अडकली लग्न बंधनात 

मुंबई : वृत्तसंस्था – गेल्यावर्षी हिंदी कलाकारांबरोबरच  मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. आता या नावामध्ये मराठी अभिनेत्री स्मिता तांबे हिचा समावेश झाला आहे. आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान मिळवलेल्या स्मिताने नाट्य कलाकार विरेंद्र द्विवेदीसह लग्नगाठ बांधली आहे.
मराठमोळ्या आणि उत्तर भारतीय पारंपरिक या दोन पद्धतीने हा विवाह सोहळा नुकताच पार पडला. यावेळी नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी स्मिताची खास मैत्रीण अभिनेत्री रेशम टिपणीस आवर्जून उपस्थित होती. आपल्या मैत्रिणीला नववधूच्या रुपात पाहून रेशमच्या आनंदाला पारावार  राहिला नाही. “दोघं रेशीमगाठीत अडकल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता हे आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहून खूप छान वाटत आहे” अशी प्रतिक्रिया रेशमने दिली आहे.
स्मिताने मराठी व हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. जोगवा, ७२-माईल्स, परतु, देऊळ यासह विविध मराठी सिनेमात तसंच सिंघम रिटर्न्स, रुख अशा बॉलीवुडच्या सिनेमातही स्मिताने अभिनय केला आहे.