छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, केतकीला दिग्दर्शकाने सुनावले खडेबोल

पोलिसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे केतकी विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. चित्रपट दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी देखील तिच्याबाबत राग व्यक्त केला आहे. तरुण पिढीला नावे ठेवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? असा सवाल त्यांनी केतकीला विचारला आहे.

महेश टिळेकर यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमार्फत त्यांनी केतकीवर निशाणा साधला आहे. केतकीने तिच्या पोस्टमधून, वक्तव्यामधून समाजात व तरुणांमध्ये द्वेष, तिढा कसा निर्माण होईल याचाच प्रयत्न केला आहे. मला केतकीला हेच विचारायचे आहे की, जेव्हा महाराष्ट्रात दुसरी मोठी संकटे येतात, मग ती पूरजन्य परिस्थिती असो किंवा मग कोरोनाचा प्रादुर्भाव अशा वेळी तरुण पिढीच मदतकार्यात सर्वांत पुढे असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनून ते मदत करतात. तेव्हा केतकीने त्यांचे कौतुक केले का? स्वत: काही केलंय का? त्यामुळे तरुणपिढीला नावे ठेवायचा तिला काय अधिकार आहे?

याच पोस्टमध्ये तिने तरुणपिढीचे प्रेरणास्थान हे ‘सैराट’मधील आर्ची आणि परशा हे आहेत असे सुनावले आहे. सहा महिन्यांपूर्वी याच केतकीने एका विशिष्ट दिवशी त्या समाजातील लोक केवळ प्रवास मोफत मिळतो म्हणून मुंबई पाहण्याच्या उद्देशानेच मुंबईला येतात असा आरोप केला होता. तेव्हा तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतीराव फुले यांचे कार्य का आठवले नाही आणि इतक्या लवकर तिचे मतपरिवर्तन झाले का? असे प्रश्न महेश टिळेकर यांनी केतकी चितळे हिला विचारले आहेत.