‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’च्या अडचणीत वाढ, आता ब्राह्मण महासंघाकडूनही आक्षेप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आलोक राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटातील सविता भाभी या कॉमिक कॅरेक्टरवरुन वाद सुरु असतानाच आता चित्रपटाच्या नावावरुन ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी चित्रपटावर आक्षेप घेत नावात बदल करण्याची मागणी केली आहे. आनंद दवे यांनी सांगितले कि, ‘अश्लील हा शब्द जरी मराठी भाषेत असला तरी तो उघडपणे आपण उच्चारत नाही. मात्र या चित्रपटाच्या नावातच हा शब्द असल्याने चित्रपटात काहीतरी अश्लील दाखविण्यात येईल, असं प्रेक्षकांना भासविण्यात येत आहे. तसंच या नावामुळे लोकांमधील विकृतीही वाढताना दिसत असल्याने त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

दरम्यान, ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अमेय वाघ स्क्रीन शेअर करणार आहे. नुकतंच या चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित झालं. मात्र यावर आक्षेप घेत दवे यांनी पुढे म्हंटले कि, “चित्रपटाचं नाव पाहिल्यानंतर आम्ही निर्मात्यांना फोन करुन नाव बदल्याची मागणी केली. परंतु चित्रपट प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यामुळे नावात बदलणं शक्य नसल्याचं सांगण्यात आलं, मात्र आम्ही आमचा विरोध कायम ठेवणार आहोत. तसेच , ज्याला हा चित्रपट पाहायचा आहे त्यांनी तो पाहावा. मात्र आम्ही या चित्रपटाला कायम विरोध करु. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका, नाव बदलण्यामागचं कारण आम्ही लोकांना सांगू. तसंच अशा प्रकारचे चित्रपट पाहू नये असं आवाहनही करु”.

ब्राह्मण महासंघाच्या मते, अश्लील उद्योग मित्र मंडळ हा चित्रपट सॉफ्ट पॉर्न चित्रपट आहे. ‘सॉफ्ट पॉर्न’ म्हणजे पॉर्न चित्रपटांची पहिली आवृत्ती. अशा स्वरुपाचे चित्रपट पाहिल्यानंतर अर्थातच लोकांमधील विकृती जागी होते आणि समाजात बलात्कार, अत्याचारासारखी प्रकरणे घडतात. यापूर्वी ब्राह्मण महासंघाने ‘पद्मावत’, ‘दशक्रिया’ या चित्रपटांना विरोध केला होता.

गेल्या अनेक दिवसापासून अश्लील उद्योग मित्र मंडळ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रमोशनसाठी वापरल्या जाणाऱ्या हटके पद्धतीमुळे हा चित्रपट चर्चेत आला होता. मात्र आता चित्रपट वादाच्या कचाट्यात सापडला आहे. याआधी निलेश गुप्ता यांनी हे पात्र कॉमिक कॉपीराइट असल्याचं सांगत चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. तर आता ब्राह्मण महासंघानेदेखील चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या चितपतच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.