‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’त मराठी भाषा नाही; गुजरातला मराठीचे वावडे ?

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ च्या पाटीवर इतर भाषा आहेत. परंतु याच पाटीवर मराठी भाषा नसल्याचे समोर आले आहे. पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पटेलांच्या १४३ व्या जयंतीदिनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण करण्यात आले.  या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. नर्मदेच्या तीरावरील ही प्रतिमा पटेलांना खरी श्रद्धांजली आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात उंच असणारा हा पुतळा साकारण्यासाठी मराठमोळ्या शिल्पकाराची मदत घेतली आहे. लोकार्पण सोहळ्यावेळी छत्रपती शिवरायांचे नावही मोदी यांनी घेतले खरे, परंतु पुतळ्याच्या खाली देश-विदेशातील भाषांमध्ये लिहिलेल्या पाटीवर मराठीला स्थान दिले नसल्याचे समजते आहे.
वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांनी साकारला आहे. 182 मीटर उंची असणारा हा  पुतळा केवडीया येथे नर्मदा नदीवर  उभारण्यात आला आहे. ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) असे या पुतळ्याचे वर्णन मोदी यांनी करताना शिवरायांशी तुलना केली. मात्र, गुजरातला मराठीचे वावडे असल्याचे दिसत आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पाटीमध्ये हिंदी, बंगाली, उर्दू, तमिळ गुजरातीसह रशियन, फ्रेंच आणि चीनच्या भाषांचाही समावेश आहे. परंतु धक्कादायक बाब अशी की, शेजारच्या राज्यातील मराठी भाषेचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या पाटीमध्ये तमिळ आणि बंगाली भाषेतील नाव चुकले आहे. या पाटीवर एकूण 10 भाषा आहेत. फक्त मराठी भाषा नसल्याचे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे मोदी यांनी भाषणावेळी शिवरायांचा उल्लेख करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामध्ये शिवरायांचे शौर्य होते, असा उल्लेख केला.

पुतळ्याची इतर माहिती 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2013 मध्ये पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. पुढील चार वर्षांत लॉर्सन अॅन्ड टुब्रो या कंपनीला काम करण्यास देण्यात आले. या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे.

पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे. भूकंप अथवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे नुकसान होणार नाही अशापद्धतीने संरचना करण्यात आली आहे. तसेच पुतळा तयार करण्यासाठी तब्बल दोन कोटी 25 लाख किलो सिमेंटचा वापर करण्यात आला आहे.