‘शरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक’ : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच मतदानात परिवर्तित होईल. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी स्पर्धेत नसून भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशीच लढाई असेल असे वक्तव्य अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. शिवाय शरद पवार यांचे माघार घेणे राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीला मारक ठरणार आहे असे मतंही त्यांनी व्यक्त केले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना मांडल्या. भारिप बहुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत.

दरम्यान शहरात वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा होत आहे. यासाठी प्रकाश आंबेडकर जळगावी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी- कॉंग्रेस आघाडी ही स्पर्धेतच उरलेली नाही. कारण त्यांच्या अध्यक्षांचे उभे राहण्याचे निश्‍चित होत नाही. आता खुद्द शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांचा निर्णय कॉंग्रेस आघाडीला मारक ठरणार आहे. तसेच या निवडणुकीत मोदी लाट राहिलेली नाही. व्यापारी वर्ग मोदी सरकारविरोधी गेल्याचे चित्र आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पन्नास टक्‍के जागा निवडून येतील” असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

नागपूर, अकोला, सोलापूर आणि उत्तर पश्‍चिम मुंबई हे मतदार संघ सोडून सर्व ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिले आहेत. शिवाय औरंगाबाद आणि उत्तर- मध्य मुंबई येथे एमआयएम उमेदवारांसाठी जागा सोडण्यात आली आहे.