TET च्या पेपरमध्ये मराठीची ‘ऐशी-तैशी’, भावी शिक्षकांचे ‘शुद्धलेखन’ बिघडविण्याचा होतोय प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – निसऱ्या , हीणाचा, बेशुद्धा, राखादा, गेल्वावर, ढिकाणी, राकूण, गृहिन, आगळविगळ ……
हे वाचल्यावर तुम्ही म्हणाल की काय हे अशुद्ध लेखन. पण हे आम्ही नाही तर राज्य परीक्षा परिषदेने रविवारी घेतलेल्या पेपरमधील काही शब्द आहे. दोन पेपरमध्ये मिळून अशा १००हून अधिक शुद्धलेखनाच्या चुका होत्या. इतकेच नाही तर जे शब्द मराठी भाषेतच नाहीत असे अनेक शब्द या पेपरमध्ये दिसून आले.
शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शासनाने टीईटी (शिक्षक क्षमता चाचणी) अनिवार्य केली आहे. त्यामुळे डीएड व बीएड केलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने टीईटी परीक्षा देतात. रविवारी टीईटी परीक्षा पार पडली. परंतु, या परीक्षेसाठीच्या पेपरमध्ये व्याकरणाच्या, शुद्धलेखनाच्या इतक्या चुका होत्या की, भावी शिक्षकांचे मराठी बिघडविण्याचा प्रयत्न या परिक्षेतून होतोय का असा प्रश्न आता विचारला जात आहे.

दीड वर्षानंतर रविवारी ही परीक्षा झाली. त्यात राज्यातील १ हजार ४० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेला ३ लाख ४३ हजार २८३ जणांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेते. हे पेपर तज्ञ मंडळीकडून काढले जातात. तरीसुद्धा इतक्या चुका होतात. चुकांचा हा क्रम दरवर्षीचा आहे. त्यामुळे भावी शिक्षकांचे शुद्धलेखन बिघडविण्याचा परिषद प्रयत्न करीत आहे की काय असा प्रश्न परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

या पेपरमधील प्रश्नाच्या व पर्यायाच्या वाक्यरचना मोठ्या प्रमाणात चुकल्या आहेत. त्यामुळे प्रश्न काय आणि उत्तर काय हेच कळत नव्हते. काही प्रश्नांचे पर्याय असे दिले आहेत, जे शब्द मराठी भाषेतच नाहीत. पुनकत्पादिन, इषिन, काकतानीय, काही प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायामध्ये एकही पर्याय बरोबर नाही. एक प्रश्न असा विचारला गेला की पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. मात्र वाक्यच दिलेले नाही. एका प्रश्नासाठी दिलेल्या ४ पर्यायापैकी दोन पर्याय योग्य आहे. प्रश्न पत्रिकेतील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती यामध्ये दिलेल्या प्रश्नात कोणताही शब्द अधोरेखित करण्यात आला नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर नेमके कसे द्यायचे अशा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. अशा पेपरमधील असंख्य चुका विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –