अवघ्या जगात माय मानतो मराठी ,जपतो मराठी …

पोलीसनामा ऑनलाइन – २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा आहे यात काहीच शंका नाही. इस्रायली मराठी,कोंकणी,कोल्हापुरी,खानदेशी,चंदगडी
बोली,चित्पावनी,झाडीबोली,डांगी,तंजावर मराठी,तावडी,देहवाली,नंदभाषा,नागपुरी,नारायणपेठी बोली,बेळगावी,भटक्‍या विमुक्त,मराठवाडी,माणदेशी,मॉरिशसची मराठी,मालवणी,वर्‍हाडी,कोळी
असे अनेक प्रकार मराठी भाषेचे पडतात. पण मुळात ही भाषा बोलली गेली पाहीजे. आजच्या नव्या पिढीला वाढवताना इतर अत्यावश्यक भाषांच्या गर्दीत आपली मायाबोली मराठी भाषा विसरता काम नये. भाषेचं बाळकडू प्रत्येक मुलात रुजलं तर पुढे जाऊन ती भाषा वाढायला मदत होईल.

भाषा शुद्ध आणि अशुद्ध

आपल्या भाषेला शुद्ध आणि अशुद्ध भाषा असे आपणच वेगळे करत आहोत. भाषा ही भाषा आहे. ती आहे तशी जपली पाहिजे भले ती ग्रामीण असो किंवा मग शहरी. भाषेची श्रीमंती अपार आहे. ती अशुद्ध(गाऊंढळ) आहे म्हणून बोललीच नाही गेली तर तिचे सौन्दर्य ,अस्तित्वच संपून जाईल. असे होणे केव्हाही घातकच आहे.

सोशल मीडियाचा हातभार

मराठी भाषेचा प्रसार होण्याकरिता सध्याच्या काळात सोशल मीडियाचा मोठा हातभार लागला आहे असे म्हणायला काहीच हरतक नाही. डिजिटलायझेशन मुळे सर्व काही ऑनलाईन उपलब्ध झाले. त्यामुळे भाषेचा प्रसार व्हायला मोठी मदत झाली. मराठी साहित्य ,मराठी लेख, मराठी लोककला यानिमित्ताने जगभर पोहचायला मदत झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वर्तमानपत्रासारखे माध्यम देखील डिजिटल झाले आहे. एवढेच काय व्हाटस अँप सारख्या सोशल मीडिया मधून येणारा अस्सल मराठीतील विनोद देखील भाषेचा प्रसार करून जातो. पण हे होत असताना सोशल मीडियावर आपल्या भाषेचा जबाबदारीने वापर होणे तितकेच महत्वाचे आहे.

मराठी चित्रपटांची महत्वाची भूमिका

चित्रपट हे भाषेचा प्रसार करणारे उत्तम माध्यम आहे. मराठी चित्रपटाचा दर्जा उंचावत आहे. चाकोरीबाहेर जाऊन बोलीभाषेतल्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. रटाळवाणे कथानक सोडून समाजाच्या विविध अंगांचा अभ्यास करून मराठी सिनेसृष्टी नवी उभारी घेत आहे. श्वास, सैराट, नटसम्राट, काकस्पर्श, दशक्रिया, गुलाबजाम, अशा अनेक चित्रपटांच्या कथानकावरून मराठी भाषेची प्रचिती सर्वांना आली आहे. मराठी भाषेचा हाच गोडवा कायम राखण्यासाठी निव्वळ गौरवाच्या भूमिकेतून तिच्याकडे न बघता उद्याच्या जबाबदारीसाठी ती समृद्ध कशी करता येईल याचा स्वच्छ विचार व्हायला हवा.