उदगीर/लातूर : देऊळवाडी खून प्रकरणातील 3 महिला आरोपींना जामीन मंजूर

उदगीर/लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – उदगीर तालुक्यातील देऊळवाडी येथील बालाजी गताटे व गंगाधर गताटे या भावकीतील कुटुंबामध्ये शेतात जेसीबीच्या सहाय्याने कालवा काढण्याच्या कारणावरुन वाद होता. 1 मे रोजी त्यांच्यात काठ्या कुऱ्हाडीने मारहाण झाली होती. या भांडणात रुद्रप्पा गताटे यांचा सरकारी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी तक्रारदार सतीश गताटे यांनी प्रताप गताटे यांच्यासह इतर 11 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला होता. त्या विरुद्ध प्रभादेवी, आशा व रेखा गताटे यांनी उदगीर येथे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेबाबत अर्ज दाखल केला होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी ॲड. कृष्णा रोडगे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर 13 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली असता अर्जदारांच्या वकिलांनी युक्तीवाद करताना म्हटले की, अर्जदार यांचा प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग नव्हता. तसेच गुन्हा घडला तेव्हा अर्जदार हे गुन्ह्याच्या ठिकाणी हजरही नव्हते. तसेच त्यांचे एफआयआरमध्ये नाव देखील नव्हते. मात्र, घटनेच्या दुसऱ्या दिवशी हेतुपुरस्सर व द्वेष बुद्धीने अर्जदरांची नावे पुरवणी आहवालात घेण्यात आली. त्यामुळे अर्जदार हे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी पात्र आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन उच्च न्यायालयाने अर्जदारांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याची माहिती ॲड. रोडगे यांनी दिली.