CM उद्धव ठाकरे यांच्यासमोर आजी – माजी खासदारांमध्ये जुंपली

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद येथील राजकारण आजही साप मुंगसाच्या शत्रूत्वा सारखेच आहे. औरंगाबाद आणि संभाजीनगर या एकाच शहराच्या नावावर शिवसेना आणि एमआयएमच्या नेत्यांमध्ये वाद झाला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी विभागीय जिल्हावार बैठका घेतल्या. या बैठकीला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देघेही उपस्थित होते.

जलील यांनी आपल्या समस्या मांडताना औरंगाबाद असा उल्लेख करीत आपली समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडत होते. यावेळी खैरे यांनी औरंगाबाद नाही तर संभाजीनगर म्हणा असे वारंवार जलील यांना सांगत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा उल्लेख आपल्या भाषणात सुद्धा संभाजीनगर असाच उल्लेख केला.

यावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलिल यांनी सांगितले की, आता त्यांची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री खुद्द उद्धव ठाकरे आहेत ते काहीही म्हणू शकतात. त्यांचे संभाजीनगर असले तरी माझे हे औरंगाबादच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली. यावरून त्यांच्यात बैठकीतच खडाजंगी झाल्याने बैठकीची कमी आणि वादाचीच चर्चा जास्त रंगली.

खैरे आणि जलील यांच्यात नेहमीच एकमेकांवर जहरी टीका करण्याची सवय आहे. हे दोन नेते एकत्र बसण्यातही टाळत असतात. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या विभागीय बैठकीत बसण्याच्या जागेवरून वादाची ठिणगी पडली. या बैठकीला लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी आमंत्रित होते. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या खुर्चीवर चंद्रकांत खैरे बसले. नंतर आलेले जलील मागे दुसऱ्या रांगेत बसले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खैरे यांच्या शेजारी खुर्ची टाकण्याची सुचना केली.

उद्धव ठाकरे यांनी खैरे यांच्या शेजारी खुर्ची टाकल्यानंतर खैरे मात्र जागेवरून उठले नाहीत. या विषयी बाहेर आल्यावर खैरे यांनी खुर्चीवर बसण्यावरून आमचे काहीही वाद झाले नसल्याचे सांगितले. मात्र, जलील यांनी कबुली देत खैरे यांना वीस वर्षापासून खुर्चीवर बसण्याच सवय आहे. आताही ते खासदार नसल्याचे विसरले असावेत असा टोला लगावला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/