मराठवाड्यात पावसाच्या सुरुवातीने शेतकरी ‘सुखावला’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांसह सामान्य माणूस सुखावला आहे. हिंगोलीत रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून परभणी, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. अक्कलकोट परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे.

पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठवाड्यात अखेर पाऊस झाल्याने बळीराज सुखावला आहे.
शुक्रवारपासून मराठवाड्यातील उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परभणी शहरासह सेलू, मानवत, पाथरी तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

दुष्काळात होरपळणाऱ्या बीड जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पहिल्याच पावसाने गेली सहा सात महिने कोरड्या पडलेल्या करपरा नदीतून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. नामलगावच्या गणपती मंदिराच्या समोर पहिल्या पाण्याची पूजा करण्यात आली.

हिंगोलीमधील अनेक भागात रात्री पाऊस पडला. हिंगोली तालुक्यातील वाझोळा येथे सायंकाळी वीज पडून त्यात दोन जनावरे मृत्युमुखी पडले. एक शेतमजूरही गंभीर जखमी झाला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा तालुक्यातील वायगाव, सारंदे, कोठरे, दुंधे भागात पहिल्या पावसाने हजेरी लावली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. अक्कलकोट, बार्शी परिसरात काल रात्री जोरदार पाऊस झाला.

जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि २६ नंतर पावसात पडणाऱ्या खंडाच्या अंदाजानुसारच पेरणी संबंधी निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर, वादळी पावसाच्यादरम्यान लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ 

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय 

डायट प्लॅन करताय.. ? वापरा या टिप्स 

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु