केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का

भोकरदन : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपला दारुण पराभवाला सामारे जावे लागले आहे. दरम्यान अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यातून गेल्या असल्या तरी दानवे यांची कन्या तथा जिल्हा परिषद सदस्या आशा मुकेश पांडे यांनी दगडवाडी ग्रामपंचायतीत गड राखला आहे.

भोकरदन ताुलक्यातील 91 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. त्यात पाच ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच बिनविरोध झाल्याने 86 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. दरम्यान सोमवारी (दि. 18) निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. दुपारी एक वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालात भाजपला अनेक मोठ्या व महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत धक्के बसतांना दिसून आले.

भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांची पिंपळगाव रेणुकाई ही महत्त्वाची ग्रामपंचायतही भाजपच्या ताब्यातून निसटली असून, यासह सिपोरा बाजार, सुरंगळी, फत्तेपुर, आलापूर, वदोड तांगडा, बोरगाव जंहागिर, बाभूळगाव, जळगांव सपकाळ, जवखेडा ठोंबरे या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीतही भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याचे दिसत आहे. अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतीतही दारुण पराभव मिळाल्याने हा ऐका प्रकारे हा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाच मोठा धक्का मानला जात आहे.