वाढवण सागरी अभयारण्य घोषित करण्यासाठी मोहीम, पर्यावरणप्रेमींच्या प्रयत्नांना प्रतिसाद

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – वाढवणच्या समुद्रात अनेक दुर्मीळ मत्स्य प्रजाती व जैवविविधता आढळून (Rare fish species and biodiversity found ) येत असल्याने सागरी अभयारण्य घोषित (marine Sanctuary declared ) करावे यासाठी पर्यावरणप्रेमींचे प्रयत्न सुरु असून त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र येथील सागरी मत्स्यसंपदा व जैवविविधता टिकून राहावी यासाठी सुरू केलेल्या मोहिमेवर सरकार काय भूमिका घेईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वाढवणच्या समुद्रात बंदर उभारणी करून ही सागरी संपत्ती नष्ट करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र या ठिकाणी अनेक दुर्मीळ मत्स्य प्रजाती व जैवविविधता आढळून येत असल्याने ही जैवविविधता टिकवून ठेवावी अशी मते नागरिकांननी समाजमाध्यमावर नोंदवली आहेत. बॉम्बे याना नावाची समुद्री गोगलगाय फक्त मुंबई समुद्रात आढळते, मात्र ती इथेही आढळली आहे. पाइप फिश या माशाला राष्ट्रीय प्राणी वाघाप्रमाणेच संरक्षण प्राप्त असल्याची माहिती प्रा. भोईर यांनी दिली. त्यामुळे येथील जैवविविधता टिकविणे आवश्यक असल्याचे मत भोईर यांनी व्यक्त केले. इथे दगडाखाली आढळणारा पोरसेलिन क्रॅब (खेकडा) हा खेकडा नसून शिवडंचीच (लॉबस्टर) एक जात असून हे या परिसराचे वैशिष्ट्य आहे. याचबरोबरीने पाइप फिश, कोरल हे प्राणी, स्पायडर क्रॅब, पोर्सेलिन क्रॅब, तारामासा तसेच सॉफ्ट कोरल प्रजातीच्या तीन प्रजाती आहेत. त्यापैकी निळ्या रंगाचे प्रवाळ केवळ येथेच सापडत असावेत असा अंदाज पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. तसेच दुर्मीळ प्रजातीचे समुद्री घोडे येथील स्थानिकांनी पाहिले असल्याचे म्हटले आहे.विरार येथील विवा महाविद्यालयातील प्राध्यापक प्रो. जॉन्सन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच वाढवण समुद्राला भेट देऊन येथील सागरी जैवविविधतेची अनेक निरीक्षणे नोंदविली आहेत.

जैवविविधता टिकवावी
वाढवण हे नैसर्गिक मत्स्यबीज निर्मिती केंद्र असल्याचा उल्लेख केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेने त्यांच्या अहवालात केला आहे. डहाणू नोटिफिकेशनने हेच नमूद करून पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रात समावेश केला. तरीही सागरी अभयारण्य घोषित करण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे बंदर न बांधता जैवविविधता टिकवावी, अशी मते अनेकांनी व्यक्त केली आहेत.