चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा खून ?

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन (अरुण ठाकरे)-मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरातील आवळेवाडी येथील कमल अशोक निरगुडा या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी चारित्र्याच्या संशयावरुन खून केला. तिचा खून करुन मृतदेह घरातच ठेवला. विवाहितेचा खून करणाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी किन्हवली पोलिसात मृताच्या  वडिलांनी  केली आहे. ही घटना २४ ऑक्टेबर रोजी घडली होती. या गुन्ह्यातील दोषींवर गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस त्यांना अभय देत असल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे.  मयत कमलच्या वडिलांनी ठाण्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, टोकावडे परिसरातील रमेश कमळु खाकर यांची मुलगी कमल हिचा विवाह शहापूर तालुक्यातील नामपाडा येथील अशोक जयराम निरगुडा याच्याशी  मार्च २०१७ मध्ये झाला होता. अशोकची पहिली पत्नी प्रसुती दरम्यान मयत झाल्याने कमलचा विवाह अशोक बरोबर करण्यात आला होता. मात्र, अशोक हा पहिल्या पत्नीलाही मारहाण करत असल्याचे समोर आले आहे.

विवाहानंतर काही दिवस त्यांचा संसार सुखाने चालला होता. दरम्यानच्या काळात अशोक याचे शेजारी राहणाऱ्या मुली सोबत सुत जुळले आणि तो कमलला दररोज मारहाण करु लागला. परंतु हि मारहाण कमल हिने सहन करत याची कोणत्याही प्रकारे माहेरी वाच्यता केली नाही. मात्र गावातील तिची जीवलग मैत्रीण असलेल्या मुलीला तिने आपली व्यथा सांगितली होती. नवरा संशय घेऊन मला दररोज मारहाण करित आहे. मी आता माहेरी गेल्यावर परत सासरी येणार नाही असे तिने मैत्रिणीला सांगितले होते. असे असताना अशोकचे ज्या मुली सोबत  सुत जुळले होते, त्या मुलीने २० आक्टोबर रोजी जाळून घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे रहस्य गुलदस्त्यात असतानाच कमल हिच्या कडून वाच्यता झाल्यास अशोक त्याचे वडील व आई हिचे बिंग फुटेल याची भिती आरोपींना होती. म्हणुन त्यांनी तो पुरावा नष्ट करण्यासाठी कमल हिचा काटा काढण्यासाठी तिला ठार केले.

दोन दिवसांनी तिने विष प्राशन केले आहे तिला पुढील उपचारासाठी शहापुर येथे उपचारासाठी नेले असल्याचा फोन कमलच्या वडिलांना अशोकचा मामा महेंद्र कान्हु खोडका यांनी फोन करुन सांगितले. कमलचे वडिल शहापूर येथे गेले असता कमल हिच्या शरिराला दुर्गंधी येत होती. त्यामुळे कमलचे वडिलांना सासरच्या मंडळींनीच तिचा खुन केला असल्याची तक्रार पोलीसाकडे देण्यासासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. तसेच तिचे शवविच्छेदन मुंबईयेथे करण्यात यावे अशी मागणी केली असता कमल  हिचा विषारी औषध घेऊन मृत्यु झाला असल्याची फिर्याद दाखल करुन दोषींना पाठिशी घातल असल्याचा आरोप मृत कमलच्या वडिलांनी केला आहे.

माझ्या मुलीने आत्महत्या केली नसुन तीचा खून करण्यात आला असल्याचे मत कमलच्या वडिलांनी व्यक्त केले आहे.  गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांना या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावे  अशी मागणी ठाण्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.