रत्नागिरीतील वॉटर स्पोर्ट्सवर बंदी !

रत्नागिरी : पोलिसनामा ऑनलाइन – दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने अनेकजण कोकणात जाऊ लागले आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांची आर्थिक चिंता दूर होणार असे वातावरण आहे. परंतु, मेरीटाईम बोर्डाने कोरोनाचेकारण देत रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स सुरू करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत बंदी घातली. याचा गणपतीपुळेसह जिल्ह्यातील १७ स्पीड बोटींसह ५ वॉटर स्कूटरचालकांना फटका बसला.

दरम्यान, वॉटर स्पोर्टस्‌ सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी दिलेली नाही. तिथे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वॉटर स्पोर्टस्‌साठीच्या बोटी बंद केल्या आहेत असे, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगल यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही काही व्यवसाय बंद आहेत. विशेष करून पर्यटन व्यवसाय अडचणीत आहे.राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. काही नियम व अटींच्या शर्थीवर व्यवसायांना परवानगी दिली आहे. परंतु गर्दी होणाऱ्या ठिकाणांना राज्य शासनाने अजूनही हिरवा कंदील दिला नाही. पर्यटनाची ठिकाणे बंद असून, ती सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर शासनाने मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडले.

कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे बिघडलेली आर्थिक घडी सुधारण्याची संधी व्यावसायिकांना मिळाली आहे. गणपतीपुळेत वॉटर स्पोर्टस्‌ला सुरुवात झाली. पहिल्या चार दिवसांत पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लाखोची उलाढाल वॉटर स्पोर्टस्‌मधून झाली. मात्र, बुधवारी मेरीटाईम बोर्डाने वॉटर स्पोर्टस्‌ला बंदी घातली आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिवाळीनंतर पर्यटन थांबणार आहे. या चार पाच दिवसांतच कमाई होईल. मात्र, प्रशासनाला किनाऱ्यावरील गर्दी आटोक्यात आणण्यात अपयश आल्याने वॉटर स्पोर्टस्‌चालकांवर बंदी घातल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

वॉटर स्पोर्टस्‌ संघटनेचे निवेदन
मंदिर सुरू केल्यामुळे गर्दी झाली असून, आम्ही लोकांच्या मनोरंजनातून उत्पन्न मिळवत आहोत. पुढील महिन्यात परवानगी दिली तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशा आशयाचे निवेदन कोकणातील वॉटर स्पोर्टस्‌ संघटेनेकडून अधिकाऱ्यांना दिले आहे.