ओह मारिया…. ! लॅसितस्केनेची उंच उडीत हॅटट्रिक

दोहा : वृत्तसंस्था – रशियाच्या मारिया लॅसितस्केनेने मंगळवारी जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या उंच उडी प्रकारात सुवर्णपदक पटकावले. हे तिच्या कारकीर्दीतील सलग तिसरे जागतिक सुवर्णपदक आहे. मारियाने या आधी 2015 आणि 2017 मध्येही सुवर्णपदक मिळवले होते.

या स्पर्धेत रशियाच्या केवळ 30 अ‍ॅथलिटना प्रवेश देण्यात आला आहे. त्यापैकी मारिया एक आहे. ती त्रयस्थ अ‍ॅथलिट म्हणून या स्पर्धेत सहभागी झाली आहे. 2016 मध्ये रशियाला उत्तेजक प्रतिबंधक घोटाळ्यामुळे ऑलिम्पिकमधून हद्दपार करण्यात आल्याने लॅसित्सकेनची ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी हुकली. तेव्हापासून मारिया त्रयस्थ अ‍ॅथलिट म्हणून सहभागी होत आहे. जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तिने 2.04 मीटर कामगिरी नोंदवून सुवर्णपदक पटकावले. युक्रेनच्या यारोस्लावा माहुचिखने रौप्यपदक, तर अमेरिकेच्या वश्टी कुन्निघमने ब्राँझपदक मिळवले.

सलग तिसऱ्यांदा उंच उडीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी मारिया पहिली खेळाडू ठरली आहे. मारियाने आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये एकूण 10 पदके मिळवली आहेत. यामध्ये आठ सुवर्णपदकांचा समावेश असून दोन रौप्यपदके आहेत. आता तिचे पुढील लक्ष्य टोकियो ऑलिंपिक आहे.

Visit : Policenama.com