मनपा मार्केट विभागप्रमुख निलंबित : गुन्हा दाखल होणार

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – रस्ता बाजू शुल्क वसूलीत अफरातफर केल्याप्रकरणी महापालिकेचे मार्केट विभाग प्रमुख कैलास हरिभाऊ भोसले यास निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.

शहरातील फेरीवाल्यांकडून रस्ता बाजू शुल्क वसूल केले जाते. महापालिकेच्या मार्केट विभागाकडे ही वसुलीची जबाबदारी आहे. महापालिकेने खासगी संस्थेला सदर कामाचा ठेका दिला होता. परंतु सदर ठेकेदाराने वसूल केलेली रक्कम महापालिकेत जमा केली नाही. याबाबत महापालिका आयुक्त द्विवेदी यांनी सदर ठेका रद्द करून सदर संस्थेस काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले होते.

शुल्क वसुलीचे काम मनपाच्या कर्मचा-यांमार्फत करण्याचे आदेश दिले होते. ठेकेदार संस्थेने रस्ता बाजू शुल्क फेरीवाल्यांकडून वसूल करून ते महापालिकेत भरले नसल्याचे आढळून आल्यानंतर त्याबाबत मनपाचे मार्केट विभाग प्रमुख भोसले यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. सदरची रक्कम भोसले यांच्या पगारातून वसूल करण्याची नोटीस काढण्यात आली होती.

ठेकेदाराने न भरलेल्या रकमेबाबत मार्केट विभाग प्रमुखाने महापालिकेला कोणतीही कल्पना दिली नाही. कर्तव्यात कसूर व अफरातफर केल्याप्रकरणी मार्केट विभाग प्रमुख भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.