मोदी सरकारच्या Digital Strike चा परिणाम ! APP मार्केटमधील चीनची हिस्सेदारी 29 टक्क्यांनी घटली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं डिजिटल स्ट्राईक करत अनेक चीनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. या स्ट्राईकचा आता मोठ्या प्रमाणात परिणाम दिसू लागला आहे. चीनचा अ‍ॅप मार्केटमधील दबदबा आता कमी झाला आहे. इतकंच नाही तर भारतीय अ‍ॅपचा बोलबाला वाढला आहे असंही सांगितलं जात आहे. एका कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

चीनची मार्केटमधील हिस्सेदारी कमी झाल्यानं याचा फायदा भारतीय कंपन्यांना झाला आहे. अ‍ॅप्सफ्लायर या कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणात अ‍ॅपवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर चीनची अ‍ॅप मार्केटमधील हिस्सेदारी तब्बल 29 टक्क्यांनी घटल्याचं समोर आलं आहे.

अमेरिकन, रशिया, इस्राइल अ‍ॅपचा धडाका

2020 मध्ये चीनी अ‍ॅप डाऊनलोड करण्याचं प्रमाण हे 29 टक्क्यांनी घटलं आहे. तर भारतीय अ‍ॅप डाऊनलोड करण्याचं प्रमाण हे 39 टक्क्यांनी वाढलं आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अमेरिका, रशिया, इस्राइल, जर्मनी या देशात विकसित करण्यात आलेल्या अ‍ॅप्सच्या धडाक्याचाही चीनी अ‍ॅपवर परिणाम झाला आहे असंही यात सांगण्यात आलं आहे.

भारताच्या ग्रामीण भागातून अधिक मागणी

अ‍ॅप्सफ्लायर कंपनीचे भारतातील व्यवस्थापक संजय त्रिसाल यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, भारतातील निमशहरी आणि ग्रामीण भागात भारतीय अ‍ॅप्सला मोठी मागणी असल्याचं दिसून आलं. टियर 2 आणि टियर 3 भागातील शहरांमध्ये भारतीय अ‍ॅप्सला 85 टक्के मागणी असल्याचंही त्रिसाल यांनी सांगितलं.

पुढं बोलताना त्रिसाल म्हणाले, भारतीय कंपन्यांनी विकसित केलेल्या गेमिंग, फिनटेक आणि मनोरंजन गटातील अ‍ॅप्स निम-शहरी आणि ग्रामीण भागात सर्वात लोकप्रिय आहेत. छोट्या शहरात भारतीय अ‍ॅप्सच्या डाऊनलोडिंगचं प्रमाण जास्त आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.