Coronavirus Impact : पुण्यातील मार्केट यार्ड उद्या सुरु, मात्र ‘या’ 7 दिवशी पुर्णपणे बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांनी बंद ठेवला आहे. आज मार्केटयार्ड आडते असोसिएशनची तातडीची सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये मंगळवारी (दि.24) फळे, भाजीपाला, व कांदा – बटाटा बाजार सुरु राहणार असून बुधवार (दि.25) पासून 31 मर्चपर्यंत संपूर्ण मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

यापूर्वी आडते असोसिएशन व दोन्ही कामगार संघटनांनी शुक्रवार ( दि.20) व शनिवार (दि.21) रोजी फळे-भाजीपाला व कांदा – बटाटा बाजार संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच दर बुधवारी व दर शनिवारी या दोन दिवशी संपूर्ण बाजार स्वच्छते करिता बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आडते असोसिएशनने मंगळवारी मार्केट यार्ड सुरु ठेवून 31 मार्चपर्यंत मार्केट यार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या लग्नसराई सुरु असल्याने पुण्यात सोने, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोक येत असतात. त्यामुळे दुकानामध्ये गर्दी होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध संघटनांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे मार्केट यार्डमधील फळे भाजीपाला व कांदा – बटाटा बाजार संपूर्णपणे 31 मार्चपर्य़ंत बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आलेला आहे.