लग्नानंतर सेक्स न केल्याने विवाह रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

ती २१ वर्षाची तर तो २३ वर्षाचा त्यांनी रजिस्टार कार्यालयात जाऊन रितसर रजिस्टर लग्न केले़ पण, त्यानंतर ती कधीही त्याच्या घरी रहायला गेली नाही की, त्याच्याबरोबर तिचे पतीपत्नी म्हणून शारिरीक संबंध आले नाही. नऊ वर्षाच्या या संघर्षानंतर आता हायकोर्टाने तिचा झालेला हा कथित विवाह रद्द केला आहे़ न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी हा निकाल देत कोल्हापूरच्या तरुणीला न्याय दिला आहे.

कोल्हापूरमधील हे दाम्पत्य विवाह झाल्यापासून गेली ९ वर्षे कायदेशीर भांडणे करीत आहेत. हा विवाह २००९ मध्ये झाला होता. कोल्हापूरमधील ही तरुणी २१ वर्षाची होती़ तर तो २३ वर्षाचा या तरुणीचे म्हणणे होते की, त्याने आपल्याला एका को-या पेपरवर सही करायला सांगितले. त्यानंतर त्याने आपल्याला रजिस्टार आॅफिसमध्ये नेले. हे विवाहचे कागदपत्र असल्याचे आपल्याला समजले नाही. जेव्हा ते समजले, तेव्हा आपण विरोध केला.

न्यायालयाने तिचा दावा मान्य केला आणि विवाह विच्छेदास अनुमती देण्यात आली. त्याचवेळी हायकोर्टाने मात्र, यात फसवणुक केल्याचा दावा मान्य केला नाही. ती शिक्षित असून तिला आपण कोणत्या कागदपत्रावर सही करीत आहोत, याची माहिती नव्हती, हे समजणे अवघड असल्याचे म्हटले आहे.

विवाहामध्ये शारीरिक संबंध हाही महत्वाचा घटक असतो़ पण, दोघेही लग्नानंतर अगदी एक दिवसही एकत्र आले नाहीत. त्यामुळे त्यांचा विवाह हा निरर्थक ठरतो. त्याने आपले तिच्याशी संबंध असल्याचा दावा केला तरी तसा कोणताही पुरावा सादर करु शकला नाही.