स्मशानभूमीत मंगलाष्टके, सनई चौघड्याच्या सूरात रंगला विवाहसोहळा

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – स्मशानभूमती असते ती नीरव शांतता आणि भितीदायक वातावरण. त्यातच अंधश्रद्धेपोटी अनेकजण कामाशिवाय तिकडे फिरकतदेखील नाहीत. मात्र, परतूरमध्ये स्मशानभूमीत चक्क मंगलाष्टका ऐकू येत होत्या, तसेच सनई चौघड्याचे सूर कानी पडत होते. येथील चौकीदाराने सर्व अंधश्रद्धा बाजूला सारत अशाप्रकारे आपल्या मुलीचा विवाहसोहळा स्मशानभूमीतच आयोजित केला होता. सर्व वऱ्हाडी मंडळीही मोठ्या संख्येने उपस्थित होती. शहरातील मान्यवर मंडळींनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी अनेकजण या सोहळ्याला उपस्थित होते. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याजणांनी अंधश्रद्धेपोटी या सोहळ्याकडे पाठ फिरवली. मात्र, सर्वत्र चर्चा सुरू होती ती याच आगळ्यावेगळ्या सोहळ्याची.

येथील स्मशानभूमीचे चौकीदार सुभाष गायकवाड यांनी आपली व्दितीय कन्या रोहिणी हिचा मंगल परिणय औरंगाबाद येथील मनोज पवार यांच्याशी घडवून आणला. दोन वर्षापूर्वीच याच ठिकाणी गायकवाड यांनी ज्येष्ठ कन्येचा विवाह केला होता. पुन्हा याच स्मशानभूमीत परतूरकरांना सनई चौघड्याचे सूर ऐकू येत होते. चौकीदार गायकवाड यांनी शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांना घरोघरी जावून लग्न पत्रिका देवून आग्रहाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे या विवाह सोहळ्यात नातेवाईक व समाजबांधवांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावून नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले.

विशेष म्हणजे वऱ्हाडी मंडळीसाठी मृतदेह जाळण्याच्या ओट्याजवळच जेवणाचे टेबल लावण्यात आले होते. या लग्न विधीला उपस्थित राहिलेल्या पाहुणे मंडळींचा गायकवाड यांनी यथायोग्य आहेर देवून सन्मान केला. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात एकही जण दारु प्यालेला आढळून आला नाही. मसनजोगी समाजामध्ये लग्नात कोणी दारु पिवून आला तर त्यात जातपंचायत वीस हजारांचा दंड ठोठावते. ही इतरांसाठी आदर्श असलेली बाब अनुकरणीय आहे.