लग्न जमवले धाकट्याबरोबर, लावले थोरल्याशी, गुन्हा दाखल

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – वेगवेगळ्या कारणाने फसवणूक झाल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात दररोज दाखल होत असतात. मात्र, लातूरमध्ये एका वेगळ्याच फसवणूकीचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. लग्न जमवताना धाकट्या मुलाबरोबर जमवले आणि लग्नाच्या दिवशी थोरल्या मुलाला उभे करुन त्याच्याशी लग्न लावून देण्यात आले.

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर नवरी मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. हा प्रकार लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे घडला. अहमदपूर येथील एका तरुणीला देगलूर येथील जयेंद्र जाधव या तरुणाचे स्थळ आले होते. तरुणाच्या घरच्यांनी जयेंद्रचेच नाव विजेंद्र असेही असल्याचे सांगितले. विजेंद्र जाधव या नावाची शैक्षणिक कागदपत्रे दाखवली. तसेच, मुलगा पुण्यात नोकरीस असल्याचे सांगितले. यावर मुलीकडच्यांनी विश्वास ठेवला.

त्यानंतर, १० डिसेंबर २०१८ ला दोघांचे लग्न लावण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लग्नानंतर मुलीच्या लक्षात आले. वास्तविक विजेंद्र हा जयेंद्रचा लहान भाऊ असून, जयेंद्र हा कमी शिक्षीत आहे.त्यानंतर मुलीने अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या महिन्याभरापासून तरुणीस सासरच्या मंडळींनी त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच, तिच्याकडे २५ लाखांची मागणी केली जात असल्याचा आरोप मुलीने केला आहे. मुलीच्या आई-वडिलांनी जाधव कुटुंबीयांकडे विचारणा केली असता, तुमच्या मुलीस घरातून हाकालून दिल्याचे सांगण्यात आले आहे.