अन्…..मराठा आंदोलकांच्या साक्षीने त्यांनी बांधली लग्नगाठ 

अकोला: पोलीसनामा ऑनलाईन
आज ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यात मात्र या आंदोलनाचे वेगळेच रूप पाहायला मिळाले अकोला येथील अकोट मध्ये चक्क एका जोडप्याने लग्न केल्याची घटना घडली आहे. या आदोंलनात नवरा नवरी देखील सहभागी झाले होते एवढेच नव्हे तर त्यांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देखील दिल्या.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की ,अकोट तालुक्यातील  देऊळगाव येथील तेजस्विनी गावंडेचा विवाह आज अकोला तालुक्यातील गांधीग्रामच्या अभिमन्यू अढावसोबत होता. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सदनमध्ये हा विवाह आयोजित करण्यात आला होता. या लग्नासाठी दोन्हीकडील पाहुणेमंडळी उपस्थित होते. तसेच मराठा समाजाचे आंदोलक देखील उपस्थित होते.वधू तेजस्विनी आणि वर अभिमन्यूसह दोन्हीकडील मंडळींनी लग्नाआधी मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यातूनच पुढे आंदोलनस्थळीच लग्न लावण्याचा निर्णय दोन्हीकडील मंडळी आणि पाहुण्यांनी घेतला.
वधू-वर आणि पाहुणे मंडळी शिवाजी चौकातील आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घोषणाही दिल्या. त्यानंतर गडबड सुरु झाली लग्नसोहळ्याची.आरक्षणाच्या घोषणांच्या जागी मंगलाष्टके सुरु झाली. मराठा समाज आणि आंदोलकांच्या साक्षीनं अभिमन्यू आणि तेजस्विनी वैवाहिक जीवनाच्या सूत्रात बांधले गेले.
आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चाची अनेक ऐतिहासीक रुपे अख्ख्या महाराष्ट्राने, अनुभवली आहेत. मात्र, आजचे  हे अकोटमधील लग्नाचे  रुप या सर्व रुपांपेक्षा काहीसं वेगळे आणि भावनिक म्हणावे  लागेल.