भोंदु बाबाकडे घेऊन जाऊन विवाहितेचा छळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तुला मंगळ, गुरु असल्याने तुझी शांती करायची आहे, या विधीसाठी माहेरुन ३ लाख रुपये घेऊन येण्यासाठी भोंदु बाबाकडे आमवस्या, पोर्णिमा अपरात्री घेऊन जात त्याला विरोध केल्यास विवाहितेला मारहार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध जादुटोणा कायद्यासाठी गुन्हा दाखल केला आहे.

अमित मोहनराव क्षीरसागर (वय ३०), सासू सुनिता मोहनराव क्षीरसागर (वय ५७) आणि सासरे मोहनराव बाबुराव क्षीरसागर (वय ६५, सर्व रा. रंजाना कॉम्पलेक्स, कात्रज कोंढवा रोड, शिवशंभोनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २३ वर्षाच्या विवाहितेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २४ एप्रिल ते १६ नोव्हेबर २०१८ दरम्यान सुरु होता.

या महिलेच्या पती व सासू सासऱ्यांनी तिला मंगळ, गुरु असल्याने शांती करायची आहे. या विधीकरीता माहेरुन ३ लाख रुपये घेऊन ये. पैसे आणले नाही तर तुला सोडचिठ्ठी देऊ अशी धमकी दिली. त्यानंतर तिच्या वडिलांनी १ लाख रुपये आणून दिले. सासू सुनिता हिला अंधश्रद्धा व अघोरी विद्या करण्याची सवय आहे. त्या रात्री अपरात्री केस सोडून घरात घुमून जमिनीवर लोळण घेत. या महिलेच्या मनात भिती निर्माण करीत. व विधीसाठी माहेरुन पैसे आणण्याकरीता प्रवृत्त करत. यावर तोडगा काढण्यसाठी शिवीगाळ व दमदाटी करुन त्यांच्या इच्छेविरुद्ध हे येथील संजय मोहिते या भोंदु बाबाकडे रात्री अपरात्री अमावस्या व पोर्णिमेला नेहमी घेऊन जात असे. त्याला विरोध केल्यास गाडीत घालून मारहाण करीत. माहेरुन राहिलेले २ लाख रुपये घेऊन ये अशी धमकी देऊन तिला त्यांनी घराबाहेर काढून छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी विवाहितेचा छळ, मारहाण तसेच नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व आघोरी प्रथा व जादुठोणा प्रतिबंधक व उच्चाटन अध्यादेश २०१३चे कलम ३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.