टेस्टट्यूब बेबीसाठी विवाहितेचा छळ, पतीसह 8 जणांवर FIR

पुणे/चिखली  : पोलीसनामा ऑनलाइन – मुल होत नसल्याने टेस्टट्यूब बेबीसाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी विवाहितेचा शारिरीक आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात पतीसह आठ जणांवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सारच्या आठ जणांवर गुन्हा दखल केला आहे.

पती धर्मेश वाघमारे, सासू कविता वाघमारे, सासरे विष्णू वाघमारे, दीर भीमेश वाघमारे, नणंद वर्षा कामले, नंदवा रुपेश कामले, भागाबाई मानकर, कृष्णाबाई शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिलेचे लग्न 2011 मध्ये धर्मेश वाघमारे यांच्या सोबत झाले आहे. लग्नानंतर मूल होत नसल्याच्या कारणावरून आरोपींनी महिलेचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. तसेच लग्नात मागणी केल्याप्रमाणे सोने दिले नाही यावरून शिवीगाळ केली. मूल होत नसल्याने टेस्ट ट्यूब बेबीसाठी माहेराहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी आरोपींनी केली.

माहेराहून वारंवार पैसे आणावेत यासाठी त्यांनी पीडित महिलेकडे तगादा लावला होता. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांपैकी भागाबाई आणि कृष्णाबाई या दोघींनी मिळून फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या पतीचे दुसरे लग्न लावल्याचे ही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मस्के करीत आहेत.