Yavatmal News : दीड वर्षाच्या मुलीसह आईची आत्महत्या !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एका विवाहित महिलेनं आपल्या दीड वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील ही धक्कादायक घटना आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोमल उमेश उलमाले (वय 30) आणि श्रुती उमेश उलमाले (वय दीड वर्ष – मायलेकी राहणार मारेगाव) असं आत्महत्या केलेल्या आईचं आणि मुलीचं नाव आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, वणी हे कोमलचं माहेर होतं. महागाव येथील उमेश उलमाले यांच्या सोबत 11 वर्षांपूर्वी कोमलचा विवाह झाला होता. त्यांचा संसार सुखानं सुरू होता. त्यांना दोन मुली झाल्या. मोठी मुलगी 9 वर्षांची आहे. तर दुसरी मुलगी ही दीड वर्षांचीच होती.

नेमकं प्रकरण काय ?

शुक्रवारी रात्री कोमल आणि उमेश यांनी कुटुंबासह एकत्र जेवण केलं. यानंतर त्यांनी काही वेळ गप्पा मारल्या. यानंतर ते आपापल्या खोलीत झोपायला गेले. उमेश यांना बरं नसल्या कारणानं ते दुसऱ्या खोलीत झोपायला गेले. त्यानंतर काय घडलं हे नेमकं कोणालाच माहिती नाही. रात्री उशीरा कोमल आपल्या दीड वर्षांच्या श्रुतीला घेऊन घराच्या मागच्या दारानं निघून गेली. जेव्हा पती उमेश यांच्या लक्षात हे आलं तेव्हा त्यांनी कुटुंबासह कोमलचा शोध घ्यायला सुरुवात केली. कोमल कुठेच सापडली नाही. यानंतर सकाळी उठल्यानंतर उमेशनं पोलीस ठाण्यात धाव घेत कोमल बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. यानंतर पुन्हा कोमलचा शोध सुरू झाला.

विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता मायलेकींचा मृतदेह आढळून आला

शोध घेतानाच मृतकाच्या घराजवळ असणाऱ्या पुरके आश्रम शाळेनजीक थेरे यांच्या शेतातील विहिरीच्या काठावर पायातल्या चपला आणि दुधाची बाटली आढळून आली. यानंतर पोलीस आणि नागरिकांनी विहिरीत गळ टाकून शोध घेतला. यावेळी यात मायलेकींचा मृतदेह आढळून आला. दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.