शासन व जेजुरी देवसंस्थानच्या वतीने जेजुरीत सुरु होतंय मार्तंड कोव्हीड केअर सेंटर

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्याचा फटका पुरंदर तालुक्याला बसला आहे. पुरंदर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळण्यासाठी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, तहसीलदार रुपाली सरनोबत, पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या सूचनेनुसार जेजुरी येथे महाराष्ट्र शासन व श्री. मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्या पुढाकारातून मार्तंड कोव्हीड केअर सेंटर सुरु होत असल्याची माहिती श्री. मार्तंड देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी सांगितले.

जेजुरी कडेपठार पायथ्याशी असणाऱ्या जिजामाता इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये हे मार्तंड कोव्हीड सेंटर उभारले जात आहे. या सेंटर मध्ये शंभर बेडची व्यवस्था केली जात आहे.या साठी बेड, गाद्या ,बेडसीट, तसेच पिण्याचे पाणी, अंघोळीसाठी गरम व गार पाणी, दोनवेळा नाष्टा, जेवण चहा अशा पोषक आहाराची व्यवस्था देवसंस्थान पाहणार आहे. दरमहा सहा लाख रुपये यासाठी खर्च येणार आहे असे संदीप जगताप यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पवार चेरीटेबल ट्रस्टच्या माधमातून देवसंस्थानकडे एक रुग्णवाहिका देण्यात आली आहे.यासाठी आमदार संजय जगताप, प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी पुढाकार घेतला आहे. रुग्णांसाठी देवसंस्थानच्या वतीने या रुग्णवाहिकेची सेवामोफत दिली जाणार आहे. जेजुरी येथील हे कोव्हीड सेंटर चालविण्यासाठी जेजुरी नगरपालिका, जेजुरी पोलीस स्टेशन व ग्रामीण रुग्णालय सहकार्य करणार आहे.

१८ मार्च रोजी जेजुरीचे खंडोबा मंदिर बंद झाले. २३ मार्च पासून लॉकडाऊन सुरु झाले. या लॉकडाऊनच्या काळात जेजुरी देवसंस्थानच्या माध्यमातून अनाथ, बेघर, परप्रांतीय गरजू नागरिकांना दोन वेळेचे जेवण देण्यात आले. हजारो गरीब कुटुंबियांना किराणा कीट, औषधे फवारणी, तसेच ससून रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटर साठी पन्नास लक्ष निधी देण्यात आला. तीन महिन्याच्या काळात देवसंस्थानने लॉकडाऊनच्या काळात सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून सर्वसामन्यांना आधार देण्याचे काम केले आहे. सोमवर दि २९ रोजी पासून हे नवीन मार्तंड कोव्हीड सेंटर सुरु होईल असे संदीप जगताप यांनी सांगितले. यावेळी देवसंस्थानचे विश्वस्त राजकुमार लोढा, ॲड अशोकराव संकपाळ, शिवराज झगडे, पंकज निकुडे, प्रसाद शिंदे, तुषार सहाणे, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.