अमेझॉनवर दरोडा टाकणारा कुख्यात दरोडेखोर पिस्तूलासह जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोहगाव येथे अमेझॉनच्या गोदामावर सशस्त्र दरोडा घालणाऱ्या तसेच घरफोड्या, जबरी चोरी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या कुख्यात दरोडेखोराला विमानतळ पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व चोरीची दुचाकी जप्त केली आहे.

आकाश गणपत माने (२२, मु. पो, शिनोली स्टेशन रेठरे, ता. कराड, जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना अमेझॉनवर दरोडा घालणाऱा व घरफोड्या, जबरी चोरी, वाहन चोरी अशा गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे असलेला व पोलिसांना गुंगारा देणारा सराईत नगर रस्त्यावर येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पिंगळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व एक चोरीची पल्सर दुचाकी मिळून आली. त्यानंतर त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात तीन, लोणीकंद पोलीस ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद पिंगळे, कर्मचारी पुष्पेंद्र चव्हाण, प्रशांत कापुरे, विशाल गाडे, विश्वनाथ गोणे, संजय आढारी, विनोद महाजन, वसीम सय्यद, अजय विधाते यांच्या पथकाने केली.