कौतुकास्पद ! शहिद कौस्तुभ राणेंची पत्नी सैन्यात दाखल होणार

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना जवान कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. आता त्यांच्या पत्नी कौस्तुभ यांचे कार्य पुढे चालवणार आहेत. शहीद कौस्तुभ राणे या सिंधुदुर्गाच्या सुपुत्राची पत्नी कनिका यांनीही सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. शत्रुशी लढण्याची पतीची इच्छा आपण पूर्ण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने दिलेली नोकरी नाकारली

कौस्तुभ यांच्या पहिल्या स्मृतिदिनी कनिका यांना लष्कराकडून नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये त्या सैन्यात प्रशिक्षण घेण्यासाठी रुजू होणार आहेत. वीरपत्नी कनिका यांनी अधिकारी पदाच्या परीक्षेत उत्तम यश मिळवले. त्यानंतर त्यांना हे नियुक्तीचे पत्र देण्यात आले. ७ ऑगस्ट २०१८ रोजी कौस्तुभ यांना वीरमरण आले. घुसखोरांशी लढताना ते शहीद झाले. राज्य सरकारने देऊ केलेली सरकारी नोकरी सैन्यात जाण्याच्या प्रबळ इच्छेमुळे कनिका यांनी नाकारली.

कोण होते कौस्तुभ राणे

उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना हौतात्म्य प्राप्त झाले. कौस्तुभ यांनी बालपणापासूनच सैन्यात जाण्याचे ध्येय बाळगले आणि त्याचा त्यांनी यशस्वी पाठलागही केला. मिरा रोड परिसरातच बालपण गेलेले कौस्तुभ राणे यांचे प्राथमिक शिक्षण तेथील होली क्रॉस शाळेत झाले. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आठ वर्षांपूर्वी ते कंबाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर चेन्नई येथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २०११ मध्ये सैन्यात लेफ्टनंट पदावर नियुक्त झाले. २०१३ मध्ये त्यांना कॅप्टनपदी तर २०१८ मध्ये मेजरपदी बढती मिळाली. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये ३६व्या बटालियनमध्ये ते तैनात होते. सैन्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २६ जानेवारीला त्यांना सेना पदकाने गौरवण्यात आले होते.

आरोग्यविषयक वृत्त –