पीएसआय छत्रपती चिडे यांना शहीदाचा दर्जा

चंद्रपूर : पोलीसनामा आॅनलाईन – दिवंगत पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना राज्य शासनाने शहीदाचा दर्जा प्रदान केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे अवैध दारू विक्रेत्यांशी त्यांनी लढा दिला. हा लढा देत असताना पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे मरण पावले होते. दरम्यान त्यांच्या कुटुंबियांनाही काही लाभ मिळणार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना सेवानिवृत्तीपर्यंत अर्थात वयाच्या 58 वर्षापर्यंत संपूर्ण वेतन, नुकसानभरपाई व अन्य देय लाभ देण्यात येणार असल्याचे समजत आहे.

आतापर्यंत नक्षलवादी किंवा दहशतवादी यांच्याशी लढतांना जीव गमावणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना शहीदांचा दर्जा दिला जात होता. पंरतु आता दारू तस्करांशी लढतांना जीव गमावणाऱ्या चिडे यांना विशेष बाब म्हणून हा दर्जा देण्यात आला असल्याचे समजत आहे. मुख्य म्हणजे अशा पद्धतीने मृत अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना वेतन व देय लाभ मिळण्याची महाराष्ट्रातली ही पहिलीच घटना असल्याचंही समजत आहे.

महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणी नोव्हेंबर 2008 च्या शासन निर्णयातील तरतुदी लागू होत नव्हत्या.  मात्र मुख्यमंत्र्यांना केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. याआधी मुख्यमंत्री निधीतून 10 लाख रुपयांची मदत चिडे कुटुंबीयांना देण्यात आली आहे. या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार असे एकूण 16 लाख रुपयांची मदत चिडे कुटुंबीयांना देण्यात आली असल्याचंही समजत आहे.

चिडे यांच्या मुलाला वयाच्या 18 वर्षानंतर अनुकंपा तत्वावर नोकरी सुद्धा देण्यात येईल, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी चिडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना परिपत्रकाची प्रत सुपूर्द केली. इतकेच नाही तर त्यांच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित वसतिगृह आणि शिक्षण शुल्क सुद्धा माफ करण्यात आले आहे.