शिवसेनेने भाजपशी युती केल्याने ‘यांचा’ शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – साडेचार वर्षे भाजप विरोधात भूमिका घेऊन स्वबळाची भाषा करणार्‍या शिवसेनेने पुन्हा भाजपशी
युती केली. ही भूमिका अनेक सामान्य शिवसैनिकांना आवडलेली नाही. याची तीव्र प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड शहरात उमटली. स्वाभिमानगुंडाळून घेतलेली लाचारीची ही भूमिका मला अजिबात मान्य नाही, असे सांगत माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.

शिवसेना, सामान्य जनतेची आघाडी, आप, स्वराज अभियान, शिवसेना असा प्रवास केलेल्या मारुती भापकर यांनी 2017 च्या महापालिका निवडणुकीत काळभोरनगर, आकुर्डी प्रभागांतून निवडणूक लढवली होती. मात्र, थोड्या मतांनी ते पराभूत झाले. पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतरही त्यांनी पालिकेतील चुकीच्या कामांविरोधात आवाज उठविला.

स्वबळाची भाषा करणार्‍या शिवसेनेने पुन्हा भाजपशी युती केली, हे न रुचल्याने भापकर यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भापकर यांनी पत्र पाठविले आहे, त्यात म्हटले आहे की, राज्यात सत्तेत सहभागी झालेल्या सेनेने सातत्याने भाजपाविरोधात भूमिका घेतली. स्वाभिमानाच्या गोष्टी केल्या. अमित शहा, दिल्लीश्वरांना उद्देशून अफजल खान, शाहिस्तेखान असे शब्द वापरले. अयोध्येत जाऊन ‘पहिले मंदिर फिर सरकार।’ ही घोषणा केली. पंढरपूरात ‘चौकीदार चोर है।’ अशी सिंहगर्जना केली. प्रत्यक्षात सामान्य माणसाला स्वप्न दाखवून मते घेतलेल्या व नोटबंदी, जी. एस. टी. याद्वारे सामान्य माणसाचे कंबरडे मोडलेल्या जुमलेबाज भाजपाबरोबर शिवसेनेने निर्लज्जपणे युती केली.

शिवसेनेची भाजपला विरोधाची भूमिका ही केवळ नौटंकी होती, हेच यातून सिद्ध झाले आहे. स्वाभिमान गुंडाळुन लाचारी स्वीकारणारी, ही सेनेची भूमिका मला अजिबात मान्य नाही. समाज माध्यमातून यावर खूप टीका होत आहे. ती मला सहन होत नाही. अशा स्वाभिमानशून्य, लबाड, लाचार पक्षात मी राहू शकत नाही. त्यामुळे मी शिवसेना पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे भापकर यांनी म्हटले आहे.