मार्वल बिल्डरच्या अडचणींत वाढ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील मार्वल रिएल्टीच्या सीईओ विश्वजित झंवर यांची फसवणूकीच्या प्रकरणात जामीनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विमाननगर येथील मार्वल एज रिएल्टर्सच्या व्यावसायिक प्रकल्पातील दुकान देण्यासाठी ९२ लाख ११ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार मुंबईस्थित येस बँकेच्या एक्झीक्युटीव व्हाईस प्रेसिडेंटने विमानतळ पोलिस ठाण्यात दिली आहे.

सतिश सुभाष गुंडेवार (४६,कांदीवली पुर्व, मुंबई) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्वल एज प्रा. लि. चे बिल्डर विश्वजित सुभाष झंवर व कार्तिक धनशेखरन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश गुंडेवार यांना २०१४ मध्ये पुण्यात दुकान खरेदी करायचे होते. त्यासाठी ते दुकानाचा शोध घेत असताना विमाननगर येथे मार्वल एज क्लोवर पार्क नावाच्या व्यावसायिक प्रकल्पामध्ये दुकाने विक्रीला असल्याचे समजले. त्यांनी डिसेंबर २०१४ मध्ये मार्वल रिएल्टर प्रा. लि. च्या या प्रकल्पाला भेट दिली. त्यावेळी या प्रकल्पाचे बांधकाम सुरु होते. त्यांना हा प्रकल्प आवडल्याने दुकान खरेदी करण्यासाठी विश्वजित झंवर व धनशेखरन या दोघांना ते भेटले. त्यांच्याशी चर्चा करून या प्रकल्पातील ८९६ चौरस फुटाचे दुकान १ कोटी २५ लाख ६२५ रुपयांना खरेदी करण्याचे ठरले. त्यानतंर गुंडेवार यांनी दुकानाचे कोटेशन देऊन तीन महिन्यात ताबा देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर गुंडेवार यांनी झंवर व धनशेखरन यांना ९२ लाख ११ हजार ७२७ रुपये दिले. झंवर यानी गुंडेवार यांना दुकानाच्या विक्रीच्या करारनाम्याचा ड्राफ्ट सही करून प्रकल्पाचा फ्लोअर प्लानही दिला. परंतु तीन महिने उलटल्यानंतर त्यांनी दुकानाचा ताबा न दिल्याने प्रत्यक्ष भेटून आणि फोनवरून त्याची विचारणा केली. मात्र मनपाकडून बांधकामाचा प्लान मंजूर झाला नसल्याने दुकान खरेदीचे अग्रीमेंट करून देता येणार नाही. असे झंवर यांनी त्यांना सांगितले. परंतु यानंतर अनेकदा ईमेल, फोनवरून त्याचा पाठापुरावा केल्यावर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. दुकान खरेदीचे अग्रीमेंट न दिल्याने पैसे परत मागितले परंतु तेही दिले नाहीत. त्यामुळे गुंडेवार यांनी अखेर विमानतळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

यापुर्वी मार्वल रिएल्टरच्या विश्वजित झंवर यानी १ कोटी ८२ लाख रुपयांची फसणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीनही झाला. परंतु आता दुसरा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.