मेरी कोम वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये ; सातवे पदक निश्चित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था-महिला विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत पाच वेळेस विश्व विजेती ठरलेल्या मेरी कोमने आज सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मेरी कोमने चीनच्या यू वु वर 5-0 ने शानदार विजय मिळवला. या विजयासह मेरी कोमने एआयबीआय महिला विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेतील सातव्या पदकावर आपली दावेदारी निश्चित केली आहे. 48 किलो वजनी गटात मेरी कोम सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. मात्र, 54 किलो वजनी गटात मनीषा मौनला स्‍टोयका पैट्रोवाकडून पराभव पत्‍करावा लागला आहे.

पाच वेळा राष्‍ट्रीय चॅम्पियन असलेल्‍या मेरी कोमसाठी आजचा दिवस विजयाचा ठरला आहे. मेरीने आज सकाळी चीनच्या यू वु वर 5-0 (30-27, 29-28, 30-27, 29-28, 30-27) ने दणदणीत विजय मिळविला. आता गुरुवारी तिचा सामाना कोरियाच्या हयांग मि किम हिच्याशी होणार आहे.

मेरी कोम या विजयानंतर म्‍हणाली की, ‘‘हा विजय जास्‍त कठिण आणि जास्‍त सोपाही नव्हता. मी बॉक्सिंग रिंगमध्ये लक्ष विचलित होऊ देत नाही. त्‍याचाच मला फायदा होतो. चीनची बॉक्‍सर अनुभवी खेळाडू आहे, तिच्यासेबतची ही माझी पहिलीच लढत होती.’’

गुरुवारी होणाऱ्या लढतीबाबत बोलताना मेरी कोम म्‍हणाली, कोरियाच्या हयांग मि किमला आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मी हरविले होते, आता तिच्यासोबतच सेमीफायलमध्ये लढत होणार आहे. सध्या मी तिच्या व्हिडिओ समजून घेत आहे. त्‍यानुसारच मी तिच्याशी लढणार आहे.

सध्या मेरी आणि आयर्लंडची  कॅटी टेलर यांच्या खात्यावर प्रत्येकी पाच सुवर्णपदके आहेत. त्यामुळे इतिहास रचण्याच्या दृष्टीने मेरी कोमची आगेकूच भारतासाठी आनंददायी ठरत आहे.