मेरी कोम जिंकूनच ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची सुपर लेडी बॉक्सर मेरी कोमने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिने ४८ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यान्ग मिचा ५-० असा धुव्वा उडवला. या विजयासह तिने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सातव्या पदकावर आपली दावेदारी निश्चित केली आहे.
सर्वाधिक पदक जिंकणारी पहिली महिला बॉक्सर –
मेरी कोमला या निर्विवाद विजयानं जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सहावं सुवर्णपदक जिंकण्याची संधी दिली आहे. तिनं आजवरच्या कारकीर्दीत जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत पाच सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई केली आहे. तसेच या विजयासह तिने या स्पर्धेत सातव्या पदकावर आपली दावेदारी निश्चित केली आहे. जागतिक स्पर्धेत सात वेळेस अंतिम सामन्यात पोहोचणारी आणि सर्वाधिक पदक जिंकणारी मेरी कोम पहिली महिला बॉक्सर बनली आहे.
आता अंतिम फेरीत मेरी कोमचा मुकाबला युक्रेनच्या हॅना ओखोटाशी होईल. ” मी यापूर्वी किम ह्यान्ग मिला आशियाई स्पर्धेत पराभूत केले होते. म्हणून मी सामन्यासाठी तयार होते. विजय असो किंवा पराजय, प्रत्येक खेळाडू यातून काही ना काही शिकत असतो. हॅनाच्या खेळावर अभ्यास करुन, अंतिम सामन्यात तिच्यावर मात करण्याचा प्रयत्न मी करणार आहे.” अशी प्रतिक्रिया सामन्यानतंर मेरी कोमने व्यक्त केली.
जागतिक स्पर्धेत मेरी कोमची सुवर्ण कामगिरी
२००१ (पेंसिल्वेनिया): रौप्य
२००२ (तुर्की): सुवर्ण
२००५ (रशिया): सुवर्ण
२००६ (दिल्ली): सुवर्ण
२००८ (चीन): सुवर्ण
२०१० (बार्बाडोस): सुवर्ण

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like