‘संपकऱ्यांना मेस्मा लावणार’ : बेस्ट प्रशासनाचा इशारा 

मुंबई : वृत्तसंस्था – बेस्ट कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. अशातच संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मांतर्गत कायदा लागू करुन कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला आहे. तसेच आगारप्रमुखांना सुट्ट्या देऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासन आणि कर्मचारी हे सामने – सामने येणार असल्याचं चित्र दिसत आहे.
वेतनवाढ व वेतन निश्चितीबाबतच्या रखडलेल्या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. बेस्ट महाव्यवस्थापकांसोबत कामगार संघटनेची बैठक पार पडली होती. ही बैठक निष्फळ ठरली असल्याने 30 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी संप करण्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये मतदान घेण्यात आलं होतं. यामध्ये संप करण्याच्या बाजूने भरघोस मतदान झालं होतं. अशातच आता या बैठकीत निर्णय न झाल्याने कर्मचारी संपावर जाण्याच्या निर्णयावर कायम होते. या संपाचा मोठा परिणाम मुंबईतील वाहतुकीवर होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
– बेस्टचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबद्दलच्या मंजूर ठरावाची तातडीनं अंमलबजावणी करावी
– 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रुपयांपासून सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावानं वेतन निश्चिती करण्यात यावी.
– एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतन करारावर तातडीनं वाटाघाटी सुरू कराव्या.
– 2016-17 आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा.
– कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढला जावा
– अनुकंपा भरती सुरू करावी