Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात खासगी चारचाकी वाहनातून प्रवास करताना मास्क वापरण्याची गरज नाही, पण…

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या घटली आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनाच्या नियमांमधून काही प्रमाणात सवलत देण्यात येत आहे. आता खासगी चारचाकी वाहनातून प्रवास करताना मास्क वापरण्याची गरज नसणार आहे. मात्र, प्रवास करताना गाडीमध्ये कुटुंबातीलच व्यक्ती असणे आवश्यक आहे. अन्य वाहनचालकांना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.

त्याबाबतचे आदेश प्रभारी आयुक्त सुहास दिवसे यांनी आज (शुक्रवार) काढले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला. सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने नागरिकांना या नियमातून सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार वाहनातून प्रवास करताना मास्क घालण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे.

कुटुंबासोबत चारचाकी वाहनातून पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची गरज नाही. परंतु, ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून इतर वाहनांमधून प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. कुटुंबातील व्यक्तीसोबत अन्य वाहनचालक किंवा इतर व्यक्ती एकत्रित प्रवास करत असतील, तर मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे, असे प्रभारी आयुक्तांनी परिपत्रकात नमूद केले आहे.