… म्हणून मसूद अजहर स्वतःचे घरही सोडू शकत नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये केलेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या मुळाशी आणि जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा आहे. या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने जैशची पाकमधील तळ उद्ध्वस्त केली. या हल्ल्यात मसूद अजहरच्या मेहुण्याचा आणि भावाचा खात्मा करण्यात आला. मात्र मसूद अजहरचा खात्मा झाला नाही. पाकिस्तान शांततेचा आव आणत असतो. मात्र या मसूदबाबत पाकिस्तान कोणतीही कारवाई करत नाही. त्याच्याबद्दल बोलणे टाळत असताे.

आता मात्र पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी मसूद अजहर पाकिस्तानात असल्याची कबुली दिली आहे. इतकंच नाही, तर मसूद खूप अस्वस्थ आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानलाही पुढे जायचे आहे. मात्र भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तेव्हा तणाव आणखी वाढला, असंही त्यांनी म्हटले.

मसूद अजहरवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा ‘कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी आमचे दरवाजे उघडलेले आहेत. जर भारताकडे पुरावे असतील तर बसा आणि चर्चा करा… कृपया संवाद सुरू करा आणि आम्हाला तर्कशीलपणा दाखवा, असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं.

दरम्यान, मसूद विषयी बोलताना, माझ्या माहितीनुसार, मसूद अजहर पाकिस्तानातच आहे. तो अस्वस्थ आहे. तो इतका अस्वस्थ आहे की आपलं घरही सोडू शकत नाही, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.