आता रेल्वे प्रवाशांना शंभर रूपयात मिळणार मसाज सुविधा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभाग इंदूर स्टेशनवरून धावणाऱ्या ३९ रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना मसाजची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त शंभर रुपयांत प्रवाशांना डोके व पायाच्या तळव्याची मसाज केली जाणार आहे. मसाजमुळे थकलेल्या प्रवाशांना आराम तर रेल्वेला उत्पन्न मिळणार आहे.|
इंदूर-गुवाहाटी, पुणे, अमृतसर, राजेंद्रनगर टर्मिनल्स, भोपाल, लिंगमपल्ली, भोपाल, पुरी चंदिगड, वेरावळ इत्यादी शहरांना जोडणाऱ्या गाड्यांत ही सुविधा दिली जाणार आहे. ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्याने वर्षाला सुमारे २० लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे, असे प. रेल्वे, रतलाम, विभागीय रेल्वे व्यवस्थापक लोकेश नारायण यांनी सांगितले.
तिकीट दर वगळता इतर मार्गाने उत्पन्न मिळवण्याबाबत सूचना कराव्यात, असे रेल्वेने सर्व विभागांना कळवले होते. यामध्ये रतलाम विभागाने मसाजची सुविधा देण्याबाबतचा प्रस्ताव दिला होता. रेल्वे बोर्डानेही तो मान्य केला आहे.