तारापूर MIDC मध्ये भीषण स्फोट, एकाचा मृत्यू तर तिघे जखमी

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन –   तारापूर औद्योगिक वासाहतीमध्ये असलेल्या नंडोलिया केमिकल्स या कंपनीमध्ये आज सायंकाळी भीषण स्फोट झाला. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यु झाला व तीन कामगार जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे सालवड, पास्थळ, बोईसर, तारापूर आणि किनारपट्टीच्या सर्व गावामध्ये मोठा कंप जाणवला. या स्फोटाचा आवाज पंधरा किलोमीटरवर असलेल्या पालघर शहरात देखील प्रकर्षाने जाणवला. रासायनिक प्रक्रिये दरम्यान हा स्फोट झाला. हा स्फोट औद्योगिक वसाहतीच्या टी-141 झोनमध्ये झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील बचावकार्य सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

स्फोटानंतर परिसरात वायु पसरल्याने तारापूर एमआयडीसी अग्नीशमक दलाला शोध कार्य करण्यास अडथळे निर्माण झाले होते. या अपघातानंतर सुमारे एक तासानंतर व वायुचा प्रभाव कमी झाल्यानंतर अग्निशमक दलाच्या जवानांनी बेपत्ता असलेल्या एका कामगाराचा मृतदेह शोधून काढला.

बोईसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. या स्फोटाच्या वेळी कंपनीमध्ये 14 कामगार कामावर होते व त्यापैकी 13 जणांचा शोध लागला असून तीनजण जखमी असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे. तर या घटनेत एकाचा मृत्यु झाला असून त्याचे नाव संदीप कुशवाह असून, जखमी झालेल्या कामगारांमध्ये मोहम्मद मोसिन अल्ताभ (वय-30), दिलीप गुप्ता (वय-28), उमेश कुशवाह (वय-22) या तिघांचा समावेश आहे.