धक्कादायक ! डोंबिवलीत लेबर कॅम्पला भीषण आग, 150 घरं जळून खाक तर एकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरातील मानपाडा भागात असलेल्या लेबर कॅम्पला भीषण आग लागली आहे. ही आग एवढी भीषण होती की अनेक किलोमीटर अंतरावरुन आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. या आगीत एका कामगाराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तर या घटनेत एक कामगार गंभीर जखमी झाल्याचे समजतय.

रविवारी (दि.21) सकाळी मानपाडा भागात असलेल्या लेबर कॅम्पला अचानक आग लागली. यामध्ये अनेक कामगारांचे संसार जळून खाक झाले. या घटनेमुळे अनेक कामगारांना बेघर व्हावे लागले. ही आग भीषण असली तरी या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. ही आग कशामुळे लागले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. सध्या आग आटोक्यात आली असून परिसरात कुलींगचे काम सुरु आहे.

डोंबिवलीतील कल्याण शील रोडवर एका बहुमजली इमारतीचे काम सुरु आहे. कामावर असणाऱ्या मजूरांसाठी वसाहत बांधण्यात आली आहे. रविवारी सकाळी अचानक आग लागली. यामध्ये तपन महालदार या कामगाराचा मृत्यू झाला तर सुरेश कुमार हा कामगार गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 150 हून अधिक घरं जळून खाक झाली आहे. आग लागल्याने सिलिंडरचे स्फोट झाले. यामुळे आग भडकली. काही क्षणात या आगीने रौद्ररुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तास पाण्याचा फवारा मारुन आग आटोक्यात आणली. सध्या या ठिकाणी कुलींग प्रक्रिया सुरु आहे. या घटनेत मजुरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.