पु्ण्यातील शनिवार पेठेत इमारतीला भीषण आग ; २६ जणांची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवार पेठेतील मेहुणपुरा येथील जोशी संकुल या 5 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे प्रमाण प्रचंड होते. धुराचा इमारतीत राहणाऱ्या लोकांना त्रास होऊ लागला. अग्निशामक दलाच्या जवानांनी धुरात अडकलेल्या ४ लोकांची सुटका केली. इमारतीतील लोक टेरेसवर गेले. अशा १० जणांची जवानांनी सुटका केली आहे. ही आग सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास लागली.

प्रभात चित्रपटगृहासमोरील गल्लीत जोशी संकुल ही 5 मजली इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये औषधी साहित्याचे गोदाम करण्यात आले होते. या गोदामात सकाळी पावणेनऊ वाजता आग लागली. गोदाम बंद असल्याने आतून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. त्यामुळे बाजूला राहणाऱ्या लोकांचा त्याचा त्रास होऊ लागला. अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी बी ए सेट घालून टेरेसवरील लोकांना खाली घेतले. तसेच धुरात अडकलेल्या लोकांची त्यांनी सुटका केली. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश आले. अग्निशामक दलाचे अधिकारी विजय भिलारे आणि राजेश जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणून इमारतीतील २६ जणांची सुटका केली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही़ आता आग आटोक्यात आली असून कुलिंगचे काम सुरु आहे.