केरळ : संततधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने 10 जणांचा मृत्यू, 12 जणांना वाचवले

केरळ : वृत्तसंस्था –  केरळच्या मुन्नारमध्ये संततधार पावसामुळे एक मोठे भूस्खलन झाले आहे. या अपघातात आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. चहाच्या बागेत काम करणारे बरेच मजूर अडकले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात इडुक्की जिल्ह्यातील आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील संपर्क तुटला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, १२ लोकांना वाचवले आहे. असे म्हटले जात आहे की, येथे सुमारे ८० लोक राहतात.

परिसरात ‘रेड अलर्ट’

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सतत पडणाऱ्या पावसामुळे विद्युत लाईनवर परिणाम होऊन परिसरातील संपर्क सेवा विस्कळीत झाली आहे. भूस्खलनामुळे तेथे सुमारे १० कामगारांची घरे नष्ट झाली आहेत. घटनास्थळी पोलिस व अग्निशमन कर्मचारी उपस्थित आहेत आणि जिल्हा प्रशासनाने रुग्णालयांनाही प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. भारत हवामान खात्याने या भागात ‘रेड अलर्ट’ देखील जाहीर केला आहे.

भारतीय हवाई दलाकडून मागितली मदत

एका वृत्तसंस्थेनुसार, एनडीआरएफची टीम मदत व बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. सुमारे २० घरांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, राजमालामध्ये बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर सेवा देण्यासाठी त्यांनी भारतीय हवाई दलाकडे संपर्क साधला आहे.

खराब हवामानामुळे मदत करण्यात अडचण

केरळचे महसूलमंत्री ई चंद्रशेखरन म्हणाले आहेत की, ३ लेबर कॅम्पमध्ये सुमारे ८२ लोक राहत होते. ते म्हणाले की, भूस्खलनाच्या वेळी कामगार तिथे होते की नाही हे या क्षणी सांगता येणार नाही. चंद्रशेखर यांच्या मते, खराब हवामानामुळे घटनास्थळी पोहोचण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत.

सतत पाऊस पडत आहे

गुरुवारी उत्तर केरळमध्ये मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वायनाड व इडुक्की जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला गेला आहे. त्याचबरोबर चेलियार नदीच्या वाढीमुळे नीलांबूर शहराला पूर आला आहे.

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले की, ७ ऑगस्टला पावसाच्या पार्श्वभूमीवर मलप्पुरम जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला गेला आहे. एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासरगोडसह नऊ जिल्ह्यांमध्ये ९ ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे. मलप्पुरम जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात नऊ शिबिरे उघडली आहेत, तर एकट्या निलांबूरमध्ये सात शिबिरे उघडण्यात आली आहेत.